औदुंबर

सांगली शहारापासून समारे २५ कि.मी. अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर श्री गुरु दत्तात्रयांचे हे स्थान आहे. नरसोबाची वाडी किंवा गाणगापूर या स्थानांप्रमाणेच औदुंबरला दत्तभक्तांच्या दृष्टीने मोठे स्थानमहात्म्य लाभले आहे. औदुंबर गावाच्या परिसरात औदुंबराची असंख्य झाडे असल्यानेच बहुधा या स्थानास औदुंबर हे नाव पडले असावे.
औदुंबर हे गाव तसे लहान आहे. येथील ब्रहानंद स्वामींचा मठ तसेच भुवनेश्वरी देवाचे मंदिर पाहण्यासारखे आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : भिलवडी (पुणे-मिरज रेल्वे)
सांगली-औदुंबर अंतर : २५ कि.मी.

बत्तीस शिराळे

सांगली जिल्हयातील हे स्थान नाग महोत्सवासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे लहानसं गाव असलं तरी नागपंचमीला या गावात सार्वत्रिक नागपूजा होते व ती जगावेगळी असते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी येथील अाबालवृद्ध गावाच्या परिसरात असलेले नाग सहजपणे मडक्यात पकडतात. अति विषारी नाग असूनही लोकांना ते दंश करीत नाहीत हे विशेष. नागपंचमीच्या दिवाशी लहानमोठी माणसं-मुलं हे पकडलेले नाग मनोभावे पुजतात, त्यांची मिरवणूक काढतात व दुसऱ्या दिवशी जेथून ते पकडले तेथे त्यांना सोडून देतात. आजपावेतो नागपंचमीच्या उत्सवात कुणीही व्यक्ती सर्पदंशाने मृत्यू पावलेली नाही.
हा नाग महोत्सव बघण्यासाठी देशी व परदेशी मंडळी श्रावण महिन्याच्या प्रारंभी म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्याच्या सुमारास या गावात गर्दी करतात.
गावापासून १ कि.मी. अंतरावर असलेले गोरखनाथांचे मंदिर पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी लहानसे उपवन असून उपवनात चिंचेचे अनेक वृक्ष आहेत. अनेक वेळा येथे मोरही येतात. शंकराचे स्थान म्हणून ते पूजनीय आहे. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.
नजीकचे रेल्वे स्टेशन : सांगली
सांगली-बत्तीस शिराळे अंतर : सुमारे ६० कि. मी.
मुंबई-सांगली अंतर : ३९४ कि.मी. (रस्त्याने)

सांगली

कृष्णा नदीच्या काठावरील ऐतिहासिक शहर स्वातंत्र्यपूर्व काळात हे संस्थान होते. येथील भुईकोट किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील गणपतीचं देऊळ भव्य व प्रसिद्ध असून गणेशभक्त या श्रीगणेशाच्या दर्शनास आवर्जून जातात.

जोतिबा

जोतिबा हे स्थान जोतिबाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असून ते कोल्हापूरपासून १९ कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या एका डोंगर पठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट उंचीवर आहे. पायथ्याशी वाडी रत्नागिरी नावाचे गाव आहे. पवित्र देवस्थान म्हणून जोतिबाची ख्याती आहे. जोतिबा म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश हा त्रिमूर्ती अवतार असा भक्तांचा विश्वास आहे. चैत्र आणि वैशाखी पौर्णिमेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. त्यानिमित्ताने मोठी यात्राही भरते.
नजीकचे स्थानक : कोल्हापूर
कोल्हापूर-जोतिबा अंतर : १९ कि.मी.
कोल्हापूरपासून या ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या बसेस नियमितपणे सुटतात.

नरसोबाची वाडी

कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर असलेले हे स्थान दत्तात्रेयांचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर असलेल्या या स्थानी दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. त्यामुळेच या स्थानाला पवित्र स्थळ मानले जाते.
दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांनी या ठिकाणी १२ वर्षे वास्तव्य केले असून श्री वासुदेवानंद सरस्वती तथा टेंबे स्वामी यांना हे स्थान खूप प्रिय होते. दत्त संप्रदायातील अनेक संत-सत्पुरुषांच्या वास्तव्याने हे स्थळ पुनित झालेले आहे. तीर्थस्थान असल्याने अनेक प्रकारचे विधी व धार्मिक कार्य करण्यासाठी भाविकांची येथे सदैव गर्दी असते. श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्मदिवस शनिवारी येथे पालखी निघते.
नजीकचे रेल्वे स्टेशन : कोल्हापूर
कोल्हापूर- नरसोबाची वाडी : ४५ कि.मी.