उद्धव ठाकरे यांचा झंजावात! अकोला, चिखली, अमरावतीत प्रचंड सभा
महाराष्ट्रात फक्त एकच लाट! शिवशाहीची!!
बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी चिखलीच्या खामगाव चौफुलीजवळील मैदानावर अलोट गर्दीची सभा झाली.
चिखली, दि. ४ ऑक्टोबर २०१४

तिकडे ममता, जयललिता, मायावती या महिला असून लाटा रोखतात. एकहाती स्वत:ची सत्ता आणतात. मग आपण तर शिवरायांचे मर्द मावळे आहोत. महाराष्ट्रात शिवशाहीची लाट आणू शकत नाही काय? राज्यात शिवशाहीची लाट आणि शिवसेनेचे बहुमताचे सरकार आणणारच, असा जबरदस्त आत्मविश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.
उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा झंझावात आज विदर्भात उसळला. अकोला, चिखली आणि अमरावतीत त्यांच्या रेकॉर्डब्रेक गर्दीच्या सभा झाल्या. ऊठसूट लाटांच्या बाता मारणार्‍यांना या सभेत उद्धव ठाकरे यांनी चांगलेच सडकून काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त कश्मीरमधील पूरग्रस्तांनाही तत्परतेने मदतीचा हात दिला. त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांबाबतही तेवढाच कळवळा आणि औदार्य दाखवून मदत द्यावी. तसेच त्या शेतकर्‍यांना कर्जमुक्त करून त्यांचे सातबारा कोरे करावेत, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेला एकहाती सत्ता द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेचे उमेदवार भले गरीब असतील, पण तुमची गार्‍हाणी ऐकून घेऊन ते समस्या सोडवतील. मात्र आज तुमच्यापुढे पैशांच्या थैल्या ओतणारे उद्या तुम्हाला दारातसुद्धा उभे करणार नाहीत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या सभेतून दिला.
अब की बार, फिरसे दुष्काळ
भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले होते. पण सुशीलकुमार चलाख माणूस. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शून्य बाकी असणारी वीज बिलं तुम्हाला पाठवली. पण पुन्हा त्यांना निवडून दिल्यावर दामदुप्पट वीज बिल त्यांनी पाठवले. ते भरले नाही तर तुरुंगात जावे लागेल, अशा जाहिराती केल्या. अरे, हे शेतकरी म्हणजे काय दरोडेखोर वाटले काय, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. आता पुन्हा चुकून यांनाच निवडून द्याल ‘तर अब की बार, फिरसे दुष्काळ’ असेल हे ध्यानात धरा, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
भाजपात गरीबांचा कळवळा फक्त गोपीनाथरावांना होता
गोपीनाथ मुंडे यांची आठवण उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात काढली. भाजपमधला तोच एक माणूस होता, ज्याला गरीबांचा, शेतकर्‍यांचा कळवळा होता. त्यांच्या कुटुंबाशी आम्ही ऋणानुबंध जपले आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र शिवसेनेने उमेदवार दिले, पण पंकजा आणि प्रीतमच्या समोर आम्ही उमेदवार दिले नाहीत. नाशिकच्या गारपिटीने मरण पावलेल्या शेतकर्‍याची आठवण सांगताना उद्धव ठाकरे भावुक झाले. ते म्हणाले, अरे, एक शेतकरी शेतात जातो काय, डोलणारे पीक पाहून मुला-मुलीच्या लग्नाची, शिक्षणाची स्वप्ने पाहतो, पण अचानक गारपीट सुरू होते आणि त्याला दोन-चार पावले पळता येत नाही. जखमी होऊन तो गतप्राण होतो आणि आम्ही नालायक, ‘मुझे महाराष्ट्र दे दो, मै अच्छा महाराष्ट्र बनाकर दिखाऊंगा’, अशा घोषणा करतो? अरे जो आहे त्यातच काही कर ना, असा टोलाही त्यांनी लगावला.
बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या सातही उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या या सभेला शिवसेना नेते दिवाकर रावते, संपर्कप्रमुख आणि खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, धीरज लिंगाडे आणि विधानसभेचे उमेदवार आमदार विजयराज शिंदे, संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, प्रतापसिंह राजपूत, वसंतराव भोजने, संतोष घाटोळे, हरिभाऊ उरसाड यांच्यासह माजी आमदार तोताराम कायंदे, महिला आघाडीच्या सिंधूताई खेडेकर, चंदाताई बडे, विद्यार्थी सेनेचे शिवाजी देशमुख यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी मांडले विकासाचे व्हिजन
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांसमोर उद्धव ठाकरे यांनी विकासाचे व्हिजन मांडले. एका वृत्तवाहिनीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प असावा, प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन आणि संत विद्यापीठ उभारणार, शेतकर्‍यांना कर्जमुक्ती हा प्रथमोपचार असल्याने त्यानंतर त्यांना त्या क्षेत्रातील नामवंतांचे मार्गदर्शन देणार, असे अनेक मुद्दे उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडले.
माझ्याही अंगात विदर्भाचे रक्त विदर्भाचा तुकडा पडू देणार नाही
जे विदर्भाचा तुकडा पाडायला निघाले आहेत त्यांना सांगतो, माझ्याही अंगात विदर्भाचं रक्त आहे. माझी आजी अमरावतीची. मी विदर्भाचा तुकडा पडू देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र अखंड ठेवून विदर्भाचा विकास करीन, पण महाराष्ट्रावर होणारे हे आक्रमण रोखणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.