उद्धव ठाकरे यांचा घणाघात; वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि नागपुरात दणदणीत सभा
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीचा लाचार नको!
नागपूरच्या रेशीमबाग मैदानात रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती.
हिंदुत्वाशी २५ वर्षे असलेले नाते अचानक का तोडले याचे उत्तर भाजपवाल्यांना येत्या काळात द्यावेच लागणार आहे.

नागपूर, दि. ५ ऑक्टोबर २०१४
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीदरबारी लाचारी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका. राज्याचा मुख्यमंत्री ठणठणीत असेल तर राज्याची प्रगती होते. दिल्लीश्‍वरासमोर शेपटी हलविणारा मुख्यमंत्री राज्याचा काय विकास करणार? तो कोणत्याच कामाचा नसतो, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.
वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा झंझावातच आज उसळला होता. प्रचंड गर्दीच्या विराट जाहीर सभा झाल्या. आपल्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपची सालटीच काढली.
हिंदुत्वाच्या तेजाला आणि भगव्याला जन्म देणारा हा विदर्भ प्रांत आहे. कोणत्याही स्थितीत विधान भवनावर शिवसेनेचा भगवा फडकणारच, असा ठाम निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपुरात रेशीमबाग मैदानात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. युती तुटली, पण शिवसेना एकाकी नाही. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आहेत. भगव्यावर आजवर अनेक संकटे आली, पण आम्ही डगमगलो नाही. महाराष्ट्रात अफझल खान आणि औरंगजेबाला या भगव्यानेच लोळवले आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना आई, वडील आणि गुरूसमोर झुकेल, पण दिल्लीसमोर झुकणार नाही, असेही त्यांंनी ठामपणे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र, विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांनी कश्मीरमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करून एक चांगले केले. त्याच धर्तीवर आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून न्याय द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. सध्या गाव स्वच्छ करण्याची मोहीम सुरू झाली आहे ही शिकवण विदर्भातील संत गाडगे महाराज यांनी यापूर्वीच दिली आहे, असेही ते म्हणाले.
१५ वर्षे काय पत्ते खेळत बसले होते?
– राज्यात १५ वर्षे सत्तेत असणारे आज भारनियमनमुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन जाहीरनाम्यातून देत आहेत. मग १५ वर्षे काय पत्ते खेळत बसला होता काय, असा सणसणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ‘सगळ्यात पुढे महाराष्ट्र माझा’ अशा जाहिराती झळकवणार्‍या सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे काय केले, पीकविम्याच्या रकमेचे काय केले, कायदा-सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता याबाबत जनतेला उत्तरे दिली पाहिजेत. राज्यात साखरसम्राट आणि शिक्षणसम्राट निर्माण करण्याचे काम कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केले. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांविषयी या दोघांनाही काहीच देणेघेणे नाही. तहानलेल्यांना पाणी देण्याऐवजी धरणात मुतण्याची भाषा करणार्‍यांना महाराष्ट्र अद्यापि विसरलेला नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही हप्त्यात वाटेकरी होतात काय?
– शिवजयंतीच्या नावाखाली शिवसेना खंडणी गोळा करते या भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत समाचार घेतला. गेली २५ वर्षे शिवसेनेसोबत राहिलात आणि आता शिवसेनेला नाव ठेवता? नातं तुम्ही तोडलंत… शिवजयंतीच्या नावाने हप्तेवसुलीचा आरोप करता. मग तुम्हीही त्या हप्त्यात वाटेकरी होतात काय, असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, शिवसैनिकांवर होतील केसेस आणि मी छताला तंगड्या लावून वाटा कसा घेता येईल ते बघेन हे तुम्ही करत होतात का? पण एकाही शिवसैनिकांवर खंडणीच्या केसेस नाहीत आणि शिवसैनिक चोर, लुटारू नाहीत हे लक्षात ठेवा….!!!
पाकड्यांकडून कश्मीरचा तुकडा आणा
पाकड्यांनी कश्मीरचा तुकडा हडप केला. चीनने हिंदुस्थानचा भूभाग बळकावला. केंद्र सरकारने पहिल्यांदा सोडवून आणावा आणि मग महाराष्ट्र तोडण्याची भाषा करावी, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही महाराष्ट्रापासून विदर्भाला वेगळे होऊ देणार नाही, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आल्यास विदर्भाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तो विकास आम्ही करूनच दाखवू,असा ठाम विश्‍वास व्यक्त केला.