तुळजापुरात तळपत्या उन्हात शिवसेनेची विराट सभा
महाराष्ट्राचे तुकडे पाडायला निघालेल्या शत्रूशी रक्तसंघर्ष झाला तरी बेहत्तर!
उद्धव ठाकरे यांचा प्रचाराचा महाराष्ट्रात जबरदस्त धडाका

‘‘शहेनशहा असो की बादशहा, दिल्लीपुढे मान झुकविणार नाही हा शिवरायांचा बाणा,
महाराष्ट्र झुकेल तो फक्त तुळजाभवानी, गुरू आणि जिजाऊसमोर!’’
केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे हे बोलण्यासाठी ठीक आहे.
दिल्ली हमारी, राज्यातही आम्हीच. अरे तुमचा मुख्यमंत्री कोण? कोण आहे तुमच्याकडे चेहरा? दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री तुम्हाला हवा आहे का?
जे केले तेच देणार. विकासाची ही धारा पदरात पाडून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवा. वचन द्या, शिवशाहीचे सरकार आणा!
महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी दुष्ट मनसुबे रचले जात आहेत तेव्हा आई जगदंबे शिवरायांचा हा महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी शिवसेनेला बळ दे!
धाराशीव जिल्ह्यातील धाराशीव – कळंब, उमरगा – लोहारा, भूम-परंडा-वाशी, तुळजापूर या चार विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी तुळजापूरच्या हडको मैदानावर विशाल सभा झाली.

धाराशीव, दि. ६ ऑक्टोबर २०१४
महाराष्ट्र काबीज करण्यासाठी पंतप्रधानांसह केंद्रातील मंत्र्यांचा अफझलखानी फौजफाटा येत आहे. मोदी आले, राजनाथ आले. म्हणतात, महाराष्ट्र ऐसा बनाऊंगा… अरे, कैसे बनाओगे? कितने महाराष्ट्र बनाओगे?… दस? असा घणाघाती सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिवरायांनी घडवलेला, जोजवलेला अखंड महाराष्ट्र तोडण्याचे कपटकारस्थान सुरू आहे. आई भवानीची शपथ या शत्रूंचा सफाया करणारच, स्वराज्यावर चालून येणार्‍या, शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे पाडायला निघालेल्या शत्रूंशी रक्तसंघर्ष झाला तरी बेहत्तर, पण शिवसेना महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असा जबरदस्त एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा ‘जय भवानी, जय शिवाजी…’, ‘हर हर महादेव’, ‘उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. तुळजापुरात तळपत्या उन्हात शिवसेनेची विराट… अति विराट अशी सभा झाली.
उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा जबरदस्त धडाका महाराष्ट्रात सुरू आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव – कळंब, उमरगा – लोहारा, भूम-परंडा-वाशी, तुळजापूर या चार विधानसभा मतदारसंघांतील ओमप्रकाशराजे निंबाळकर, ज्ञानराज चौगुले, ज्ञानेश्‍वर पाटील, सुधीर पाटील या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची तुळजापूरच्या हडको मैदानावर विशाल सभा झाली. ऑक्टोबर हिट असतानाही मैदानाचा कोपरा न् कोपरा भरून गेला होता. मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याची पर्वा न करता प्रचंड जनसमुदाय उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जमला होता.
सत्ता द्या, तुळजापूरचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करतो
निवडणुका आल्या की, कॉंग्रेस, राष्ट्रवादीवाले तुळजापुरात येतात. पृथ्वीराज आले, अजित पवार आले. तुळजापूरला काय दिले, सत्तेचा उपयोग कधी तरी आई जगदंबेच्या तुळजापूरसाठी केलात काय, भाविकांसाठी काय केलेत, त्यांच्या अन्न पाण्याची सोय केलीत, यांनी फक्त स्वत:चीच सोय पाहिली. शिवसेनेचे सरकार आणा तुळजापूरचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करेन. मी वचन देतो तुम्हाला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच मैदानावर जय भवानी, जय शिवाजीचा महागजर झाला.
मुंडे- महाजन कुटुंबांशी नाते
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे म्हणजे युतीचा सांधा. हा सांधाच निखळला. युती तुटली, पण मुंडे – महाजन कुटुंबांशी आमचे नाते टिकून आहे. त्यामुळेच पंकजा, प्रीतम यांच्या पाठीशी भाऊ म्हणून मी खंबीर उभा आहे. या बहिणींच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला नाही. पंकजा, प्रीतम निवडून आल्याच पाहिजेत, पण आजूबाजूला धनुष्यबाण चालला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जे केले तेच देणार
शब्द न पाळण्याची कॉंग्रेस -राष्ट्रवादीची परंपरा आहे. निवडणुकीच्या वेळी काढलेला जाहीरनामा पाळण्यासाठी नसतो, असे विलासराव म्हणाले होते. कॉंग्रेसच्या प्रभा राव यांचे ‘प्रिंट मिस्टेक’ विधान तर प्रसिद्ध आहे. दिलेला शब्द पाळणे हा शिवसेनेचा धर्म आहे. जे केले तेच देणार. विकासाची ही धारा पदरात पाडून घ्यायची की नाही हे तुम्ही ठरवा. वचन द्या, शिवशाहीचे सरकार आणा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसागराने वज्रमूठ आवळून तसा शब्दच दिला.
महाराष्ट्र झुकेल तो फक्त तुळजाभवानी, गुरू आणि जिजाऊंसमोर
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असावे, या ‘भाजप विचाराची’ जबरदस्त खिल्ली उडविली. दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार असावे, हा विचार बोलण्यासाठी ठीक आहे. देशभरात मोदी लाटेची भरती आली होती. मग तामीळनाडू, ओडिसा, पश्‍चिम बंगालमध्ये ही भरती का ओसरली? दिल्ली आमची, राज्यही आमचेच. ठीक आहे. तुमचा मुख्यमंत्री कोण? आहे कुणी चेहरा? दिल्लीकडे बघून शेपूट हलविणारा मुख्यमंत्री हवा का? हलवू का? आता हलवू का? मग दिल्लीकर मान डोलावणार आणि सांगणार आधा इंच हिला सकते हो. चालणार का हे शिवरायांच्या महाराष्ट्रात? शहेनशहा असो की बादशहा? शिवरायांनी दिल्लीश्‍वरांसमोर कधी मान तुकवली नाही. महाराष्ट्र झुकेल तो फक्त तुळजाभवानी, गुरू आणि जिजाऊंसमोर.
शहेनशहा असो की बादशहा, दिल्लीपुढे मान झुकविणार नाही हा शिवरायांचा बाणा आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी दुष्ट मनसुबे रचले जात आहेत तेव्हा आई जगदंबे, शिवरायांचा हा महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी शिवसेनेला बळ दे, असे मागणेच उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीकडे मागितले तेव्हा उपस्थितांतून ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर घुमला.
ही तर तुळजाभवानीची इच्छा!
उद्धव ठाकरे म्हणाले, दोन दिवस विदर्भात होतो. आता मराठवाड्यात आलो आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, जागावाटपाचे गुर्‍हाळ चालू होते तेव्हा मी तुळजाभवानीच्या दर्शनाला आलो होतो. मी आईकडे काय मागितले आणि तिने मला काय दिले हे तुम्हाला १९ तारखेला समजेलच. त्यावेळी दर्शन घेत असताना गाभार्‍यातील पुजार्‍यांनी महाराष्ट्रासोबतच शिवरायांच्या तुळजापूरवर भगवाच फडकला पाहिजे अशी भावना बोलून दाखवली. मी म्हणालो, हा मतदारसंघ भाजपचा आहे, जागावाटपात मी तो शिवसेनेसाठी मागितला आहे. पुजारी म्हणाले, ते आम्हाला माहीत नाही, पण येथे डौल भगव्याचाच असला पाहिजे. मी मनात म्हणालो, आई जगदंबे हे कसले त्रांगडे? दर्शन घेऊन बाहेर येताच एक मेसेज आला. दिल्लीमध्ये राजीव प्रताप रुडी यांनी सगळे संपले, युती तुटली, असे जाहीर केले. हा जगदंबेचा कौलच नाही का? माझा विश्‍वास आहे. शिवरायांना दिला तोच आशीर्वाद भवानीने आपल्याला दिला आहे. संध्याकाळी एकनाथ खडसे यांनी फोन करून आता युती ठेवण्याची भाजपची इच्छा नसल्याचे सांगितले. मी म्हणालो, ही तर तुळजाभवानीची इच्छा…