महाराष्ट्राचा लचका तोडण्यासाठीच शिवसेनेसोबतची युती तोडलीत काय? – उद्धव ठाकरे यांचा भाजपला जळजळीत सवाल संभाजीनगरात शिवसेनेची विराट… अतिविराट सभा संभाजीनगर, दि. ७ ऑक्टोबर २०१४
सीमेवर दररोज गोळीबार होतो आहे. मात्र भाजपवाल्यांना महाराष्ट्र तोडण्याची घाई झाली आहे. महाराष्ट्र तोडण्याआधी पाकने गिळलेला कश्मीर परत आणा. चीन अरुणाचलमध्ये घुसतो आहे, त्याला रोखण्याची हिंमत दाखवा. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्याचे दुष्ट मनसुबे इथे खपवून घेतले जाणार नाहीत. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र तोडण्याचे उघड बोलले जात आहे. महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी युती तोडलीत काय, असा जळजळीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला विचारला. संभाजीनगरात उद्धव ठाकरे यांची विराट… अतिविराट… अशी सभा झाली. हा तुळजाभवानीचा महाराष्ट्र आहे, जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. तो तोडू देणार का, असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी करताच लाखोंच्या जनसमुदायाने ‘नाही… नाही…’ अशी गगनभेदी ललकारी दिली… ‘जय भवानी… जय शिवाजी…’चा नारा घुमला. उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा भगवा झंझावात आज बीड, परतूर, घनसावंगी आणि संभाजीनगरात पोहोचला. संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पसरलेले भगवे चैतन्य पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, ही पुण्याई शिवसेनाप्रमुखांची! मी शून्य! फक्त निमित्तमात्र. तीच गर्दी, तोच उत्साह! कोपरा न् कोपरा शिवसैनिकांनी भरलेला. हे राज्य व्हावे, ही त्यांची इच्छा! शिवसेना एकटी पडली असे चित्र निर्माण केले गेले. मी कोणी मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान नाही. मग हा एवढा जनसागर का लोटला? चॅनलवाल्यांनो, दाखवा जगाला, शिवसेना हा भगवा महासागर आहे. येथे फक्त भरतीच येते, ओहोटी नाही!
देण्यासारखे काही नाही, फक्त विश्‍वास आहे
जागावाटपावरून भाजपाने केलेल्या राजकारणाचा आजही उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शब्दांत समाचार घेतला. महायुती होती. तुटली. आमच्याबरोबर राजू शेट्टी होते. जानकर, आठवलेही होते. मित्रपक्षांना मी म्हणालो, माझ्या हाती काही नाही. रिकाम्या हाताने मी तुमच्याशी बोलतोय. समोरून तुम्हाला मंत्रिपदाचे आमिष येईल. लाल दिवा मिळेल. पण ज्यांनी राजकीय मतलब नजरेसमोर ठेवून २५ वर्षांच्या युतीला लाथ मारली, दोस्तावर वार केला. त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार? माझ्याकडे शब्द आहे, विश्‍वास आहे. तेवढाच मी देऊ शकतो. चित्र स्पष्ट झाले. सगळे पळाले. पण अर्जुन डांगळे मात्र शिवसेनाप्रमुखांवरील अढळ निष्ठेपायी सोबत राहिले. त्यांचे अभिनंदन, असे उद्धव ठाकरे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
केले काही नाही, जाहिराती कशाला?
मी राज्यभर फिरतोय. कधी हेलिकॉप्टरने, कधी गाडीने. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे, काही कळतच नाही. मात्र कॉंग्रेसच्या जाहिरातीत महाराष्ट्रातील गावखेडे अगदी सुजलाम् सुफलाम् झाल्याचे दाखवण्यात येत आहे. जाहिरातीत दिसणारा विकास तुमच्या गावात झाला का? महिला सुरक्षित आहेत का? शेतकर्‍यांना विमा, पीककर्ज मिळाले का? लोडशेडिंग गेले का? असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच तुडुंब गर्दीने हात वर करून ‘नाही… नाही…’ असे उत्तर दिले. काहीच केले नाहीत, मग बोंबलता कशाला महाराष्ट्र माझा म्हणून.. कशाला ते जाहिरातीची थोतांडबाजी करून जनतेला थापा मारताय, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसवाल्यांना सुनावले.
पृथ्वीराजांचा कोंबडा छान!
महाराष्ट्राची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. विकास खुंटला आहे. पण पृथ्वीराजांचे बरे आहे, त्यांचा कोंबडा छान आहे. जाकीट-बिकीट घालून जाहिरात करतात. आपला कोंबडा निदान सकाळी आरवतो तरी, यांचे आपले सगळे ढिम्म! आता एकमेकांशी भांडताहेत. कशामुळे? यांनी आघाडी तोडण्यासाठी काय पंचाग पाहिले होते काय? युतीचे तुटले आणि आघाडीचे फाटले! काय योगायोग आहे, का साटेलोटे अशी शंकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले निर्लज्जच आहेत
भाजपाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरे हे फक्त भाजपावरच टीका करत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात ते बोलत नाहीत असे अकलेचे तारे तोडले. त्याचा जबरदस्त समाचार घेत उद्धव ठाकरे म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले निर्लज्जच आहेत. लोकसभेच्या निवडणूकीत त्यांची लक्तरे आम्ही वेशीवर टांगली आहेत. लोकसभेत दाणादाण उडाली, तरीही आता मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. तुम्ही तर हिंदुत्वाशी नाते जोडले होते ना, मग ते नाते का तोडले याचे उत्तर द्या असा जाबच यावेळी उद्धव ठाकरे यांनी मागितला.
पंतप्रधान देशाचे, पक्षाचे नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी माझ्या मनात काहीही नाही. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या. मर मर मेहनत केली. आणि तुम्ही काय केलेत, त्याच शिवसैनिकांचा घात केलात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, पक्षाचे नाहीत. आमची गरज संपली की लाथ घातली. आता म्हणतात, शिवछत्रपतींचा आशीर्वाद, मोदीं के साथ! महाराष्ट्राने तुम्हाला साथ दिली ना. ४८ पैकी ४२ खासदार आले. त्यात शिवसैनिकांची मते नाहीत? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
टोपी फेकली, तुम्ही कशाला घातलीत?
महाराष्ट्रात प्रचारासाठी अफजलखानी टोळधाड येत आहे. मी बोललो. लगेच धुरळा उठला. अरे मी टोपी फेकली, तुम्ही कशाला त्यात डोके घालताय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच सभेत हशा पिकला.
मंदिर कुठे, विटा कुठे आहेत
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत शिवसेनाप्रमुख व प्रमोद महाजन उपस्थितीत ‘मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देण्यात आली होती. रामनाम असलेल्या शीलांचे पुजनही करण्यात आले होते. कुठे आहे मंदिर, त्या विटा कुठे गेल्या असा घणाघातच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. बोलले ते का केले नाहीत, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
अजित पवार, औरंगजेब तुमचा देव आहे काय?
आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पिसेच काढली. अजित पवार संभाजीनगरात आले. मला वाटले भद्रा मारोतीला जातील, प्रदक्षिणा घालतील. पण हे गेले कुठे, औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवायला. औरंगजेब काय तुमचा देव आहे काय? कोण लागतो तो तुमचा. तेथे जाऊन अलिगड मुस्लिम विद्यापीठाची भाषा करता. औरंगजेब, मोगल शहेनशहा. महाराष्ट्र गिळायला आला होता. २७ वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून बसला. पण महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लावता आला नाही त्याला. याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला मूठमाती मिळाली. आम्ही असे बोललो की जात्यंध, धर्मांध? सांगा ना, का बोलायचे नाही आम्ही? आमच्या हक्काचे का नाही बोलणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
स्वराज्याचा शत्रू तो आमचा शत्रू
आज प्रतापराव गुर्जर यांचा बलिदान दिवस, शौर्यदिन. यानिमित्ताने प्रतापराव गुर्जर यांच्या पराक्रमाची आठवण उद्धव ठाकरे यांनी जागवली. आदिलशहाच्या फौजेत सात वेडे मराठे घुसले. दिसेल त्याला कापत सुटले. मोगलांच्या फौजफाट्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. पण अस्मान गाजवले. मोठे संकट होते स्वराज्यावर चालून आलेले. स्वराज्याचा शत्रू तो आमचा शत्रू. त्याचा सफाया करणारच, अशी भीमगर्जनाच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
औरंगाबाद नव्हे, संभाजीनगरच!
औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला. या प्रस्तावाचा पाठपुरावा करा, अशी सूचना करून उद्धव ठाकरे म्हणाले, आता एमआयएमची वळवळ सुरू झाली आहे. पण येथे भगव्याचा जलजलाट आहे. येथे बाकी काही नाही. औरंगाबादचे संभाजीनगर आणि चिकलठाण विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असे झालेच पाहिजे, या उद्धव ठाकरे यांच्या भावनेला उपस्थित जनसागराने टाळ्यांचा उत्तुंग प्रतिसाद दिला.