कोकणात भगवे तूफान
वेंगुर्ले, मालवण, रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांच्या विराट सभा
लोकसभेत नरकासूराला ठेचलंत, आता महिषासूराचा वध करा!

रत्नागिरी / मालवण, दि. ८ ऑक्टोबर २०१४लोकसभेत नरकासुराला ठेचलंत… आता महिषासुराचा राजकीय वध करा आणि भगवी दिवाळी साजरी करा, असा जबरदस्त वज्राघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मालवण येथे केला. कोकणातील जमिनी हडप करून आता पानाच्या टपरीतही पार्टनरशिप मागणार्‍या ‘निरुद्योगी’ मंत्र्याला त्याची जागा दाखवून द्या, असे घणाघाती आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी अवघा कोकणकिनारा दुमदुमून गेला.
कोकणात आज शिवसेनेचे तुफानच अवतरले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वेंगुर्ले, मालवण आणि रत्नागिरीत अलोट गर्दीच्या रेकॉर्डब्रेक सभा झाल्या. मालवणचे टोपीवाला हायस्कूल मैदान आणि रत्नागिरीचे प्रमोद महाजन मैदान गर्दीने खचाखच भरले होते. कोकणवासीयांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोकणी माणूस म्हणजे माझ्या घरचा माणूस. तुमच्यासमोर भाषण करायला आलेलो नाही, तर तुमच्याशी संवाद साधायला आलोय. शिवसेनाप्रमुखांनी कधीही कुणासमोरही मान झुकवली नाही, मात्र कोकणी माणसासमोर ते नतमस्तक झाले. त्यांच्याप्रमाणेच तुमच्यासमोर मी लाख वेळा नतमस्तक होईन; पण दिल्लीतला शहेनशहा असो की आणखी कुणी, त्याच्यासमोर मी आणि माझी शिवसेना कदापि झुकणार नाही.’
विजयाचे तोरण बांधून आलोय!
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गोव्यातून सिंधुदुर्गात येताना महाराष्ट्राच्या सीमेवर विजयाचे तोरण बांधूनच आलोय. फक्त तुमची साथ हवी. आमच्यासोबत कोण आहे, कोण नाही हे माहीत नाही. आम्हाला फक्त जिंकायचे आहे, नव्हे आम्ही जिंकलोच आहोत. फक्त जाहीर व्हायचे बाकी आहे.
‘निरुद्योगी’ मंत्र्याची सालटीच काढली
कोकणातील निरुद्योगी मंत्र्यामुळे कोकणचा विकास झालेला नाही. त्याने सगळ्या जमिनी हडपल्या. प्रत्येक उद्योगात त्याला फुकटची पार्टनरशिप हवी. पानाच्या टपरीतही पार्टनरशिप सोडणार नाही. का, तर चुना लावायची सवय जात नाही म्हणून.’ कोकणातील इंचभरही जमीन आम्ही कुणालाही बळजबरीने घेऊ देणार नाही असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनेची सत्ता आल्यानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प घालवणार म्हणजे घालवणारच. चिपी विमानतळासाठी हडपलेली जागा शिवेसेनेच्या एका सभेमुळे सरकारला परत करावी लागली. सी वर्ल्ड प्रकल्पासाठी ३०० एकर जागेची गरज असताना आणखी १४०० एकर जागा घेतली. कशासाठी घेतली ही जमीन, हॉटेल उघडायला? या प्रकल्पामुळे कोकणवासीय भूमिहीन होतील हे लक्षात ठेवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
झारीतील शुक्राचार्यांना आत टाकू!
कोकणचा विकास झारीतील शुक्राचार्य आणि भस्मासुरांमुळे खुंटला आहे. इथे चांगली आरोग्य सुविधा नाही. मच्छीमार, काजू-आंबा बागायतदार, गौण खनिज असे बरेच प्रश्‍न आहेत. येणारे सरकार आपलेच आहे. तुम्ही फक्त ताकद द्या. विकासाच्या आड येणार्‍या शुक्राचार्यांना बाहेर तर काढूच, पण त्यांची गुंडगिरी मोडून त्यांना आत टाकू असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी देताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
युती भाजपने तोडली
रत्नागिरीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘प्रमोद महाजन मैदानावर हक्काने मी आलोय. महाजनांबरोबर नाते होते. ऋणानुबंध होते. आता ते कुठे तरी असतील, येथे पाहत असतील. त्यांना मी सांगू इच्छितो, तुमच्या पिढीने जी युती जपली ती शिवसेनेने नाही, तर भाजपने तोडली आहे.
कोकणशी विश्‍वासाचे नाते
शिवसेनेने कोकणातून दोन मुख्यमंत्री दिले. मुंबईत तर तब्बल १५ कोकणवासीयांना आमदारकीचे तिकीट दिले आहे. शिवसेनेचे कोकणशी विश्‍वासाचे नाते आहे. आणि ते असेच जपायचे आहे. सत्तेवर आल्यावर सिंधुदुर्गात पर्यटन केंद्रांचा विकास करू. कोकणच्या विकासासाठी सीआरझेड नियमावलीत बदल करू, असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना दिला. दोन ते तीन वर्षांत मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करू असेही ते म्हणाले.
भराडीमातेला गार्‍हाणे
समस्त कोकणवासीयांना आवाहन करतानाच उद्धव ठाकरे यांनी आज मालवणच्या भराडीमातेलाही गार्‍हाणे घातले. महाराष्ट्रात भगव्याचे राज्य येऊ दे. भराडीमाते, तुझा नवस फेडायला सर्व आमदारांना घेऊन वाजतगाजत येईन, असे साकडे उद्धव ठाकरे यांनी घालताच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर आसमंतात घुमला. ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा दुमदुमल्या.