महाराष्ट्राला उंदीर म्हणणार्‍या अमित शहांविरूद्ध संतापाची लाट…
जुन्नर, भोसरी, चाकण, चिंचवड येथे अतिविराट सभा… सर्वत्र शिवसेना झिंदाबाद!
शिवसैनिक उंदीर नव्हेत, वाघनखं! कोथळा काढतील!!
चाकणच्या अफाट सभेत उद्धव ठाकरे गरजले
उंदीर कोण हे १९ तारखेला कळेल!, महाराष्ट्राच्या जनतेने आव्हान स्वीकारले!

पुणे, दि. ९ ऑक्टोबर २०१४
महाराष्ट्राला उंदीर म्हणणार्‍यांनो, लक्षात ठेवा की शिवसैनिक उंदीर नाहीत, वाघनखं आहेत! निवडणुकीत तुमचा राजकीय कोथळा काढल्याशिवाय राहणार नाहीत, असा सणसणीत तडाखा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चाकणच्या अफाट सभेत लगावला तेव्हा विराट गर्दीतून ‘अमित शहा हाय हाय’च्या घोषणा निनादल्या. ही होती शहांविरोधातली संतापाची लाट.
उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा झंझावात आज जुन्नर, मंचर, चाकण आणि चिंचवडमध्ये अवतरला. मॅरेथॉन गर्दीच्या रेकॉर्डब्रेक सभा घेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची दाणादाण उडवून दिली. अभूतपूर्व गर्दी, उत्साह, महिलांचा प्रचंड प्रतिसाद आणि उद्धव ठाकरे यांचे तडाखेबंद भाषण. विकासाच्या मुद्द्यावर आणि व्हिजन डाक्युमेंटवर सहज संवाद यामुळे त्यांनी लोकांना जिंकले.
महाराष्ट्रात भगवे वादळ उठले आहे. लाट आहे की नाही मला माहीत नाही पण जनता त्वेषाने, संतापाने आणि विश्‍वासघात केला म्हणून पेटून उठली आहे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी ‘वाघ नहीं, उंदीर है’ या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. अफझलखान कोणाच्या दरबारात विडा उचलून महाराष्ट्रात आला होता, असा सवाल जनसमुदायाला करताच ‘आदिलशहा… आदिलशहा’ असे उत्तर जनसमुदायातून आले तेव्हा मी काही म्हटलं नाही, तुम्हीच सांगता आहात. पण नावात जर साम्य असेल तर तो केवळ योगायोग समजावा असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे म्हणाले, डोंगरातला उंदीर शोधायला आलेल्या अफझलखानाचे काय झाले ते उभ्या हिंदुस्थानला माहीत आहे. माझे शिवसैनिक उंदीर नाहीत तर वाघनखं आहेत. विधानसभा निवडणुकीत ते तुमचा राजकीय कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत असे बजावले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदींसाठी मतं मागितली. तुम्ही पंतप्रधान झालात, मग आमच्यासाठी मतं का मागत नाहीत? तुमच्यामुुळे देशात अच्छे दिन आले की बुरे दिन ते तुम्हीच शोधा, परंतु या महाराष्ट्रात शिवसेनेचं एकट्याचं आपलं सरकार येईल आणि अच्छे दिन आणेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभेत एकच जल्लोष झाला.
दिल्लीकरांपुढे झुकणार नाही!
केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार आणा या भाजपच्या प्रचारावरही उद्धव ठाकरे बरसले. गेली पाच वर्षे दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसचे सरकार होते. काय दिवे लावले? कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा गुजरातमध्ये मोदींचे सरकार होते म्हणून विकास झाला नाही का? ममता बॅनर्जींचे सरकार आहे म्हणून पश्‍चिम बंगालचा विकास होत नाही का, असे सवाल केले. तुमचा मुख्यमंत्री कोण हा महत्त्वाचा मुद्दा असून तो चेहरा तुम्ही सांगा अशी थेट विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीकरांपुढे झुकणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान ताठ मानेने जिवंत ठेवेल. या निवडणुकीत छत्रपतींचा आशीर्वाद महाराष्ट्रात कोणाला आहेत ते देशाला दाखवून देईल, असे ठणकावून सांगितले.
ऋणानुबंधांना उजाळा
शिवसेना पक्षप्रमुख यांनी जुन्नरशी आणि सावळाराम बुवा दांगट यांच्याशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. मी लहान असताना शिवसेनाप्रमुख, मॉं यांच्यासमवेत आम्ही मुंबईहून उंब्रजला बुवा दांगटांकडे आलो. वाटेत आमची गाडी बंद पडली. १९६० चा तो काळ असावा. गाडीत मॉं व आम्हाला ठेवून शिवसेनाप्रमुख मेकॅनिक शोधायला गेले. त्यावेळचा रस्ता कच्चा होता. कदाचित जंगलही असेल. पण मेकॅनिक येईपर्यंत आम्ही निर्धास्तपणे गाडीत बसून होतो. आज हा महाराष्ट्र एवढा सुरक्षित आहे का, असा सवाल केला.
महाराष्ट्राने स्वीकारले शहांचे आव्हान
महाराष्ट्राला उंदीर म्हणणार्‍या अमित शहांविरोधात राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. उंदीर कोण हे १९ तारखेला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशीच समजेल, असा इशारा अवघ्या महाराष्ट्राने दिला आहे. शहांचे आव्हान महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले आहे.
अखंड महाराष्ट्रासाठी…
महाराष्ट्राला अखंड ठेवून विकास करण्यासाठी मला सत्ता हवी आहे. गरीबांना सुखाचे दिवस यावेत यासाठी मी झटतो आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र तोडू देणार नाही असे सांगतात तर त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मोदी हे मुंबईबद्दल बोलले, आम्ही वेगळा विदर्भ करणारच असा खुलासा करतात. महाराष्ट्र तोडण्याचे हे पाप शिवसेना कदापि होऊ देणार नाही. तुमच्यात एवढीच मर्दुमकी असेल तर पाकिस्तानात गेलेला हिंदुस्थानचा भूखंड परत आणा असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.