शिर्डी, मनमाड, येवला, नाशकात विराट… विराट सभा
जिंकणारच! सत्ता शिवसेनेचीच!!
उद्धव ठाकरे यांचा जबरदस्त एल्गार

येवला येथील गोशाळा मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली. यावेळी गर्दीने मैदानाचा कोपरान् कोपरा फुलून गेला होता.

नाशिक, दि. १० ऑक्टोबर २०१४
शिवसेना एकटी नाही; तळागाळातील जनता आणि हिंदुत्ववादी शिवसेनेसोबतच आहेत. आपण जिंकणारच आणि शिवसेनेचीच सत्ता येणार, असा जबरदस्त एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला. सत्ता आली की, तुमचं ज्यांनी गिळलंय ते त्यांच्या पोटातून बाहेर काढून ताब्यात देतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच ‘शिवसेना झिंदाबाद…,’ ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला,’ ‘उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है’चा गगनभेदी गजर जनसमुदायातून घुमला…
शिर्डी, मनमाड, येवला आणि नाशिक येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या तळपत्या सभा झाल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला लुटणार्‍या, त्यांचे जगणे मुश्कील करणार्‍या आणि शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणार्‍या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तसेच विश्‍वासघात करणार्‍या भाजपचे पुरते वस्त्रहरण केले.
भुजबळांना उताणे करणारच!
येवला येथील सभेत त्यांनी घोटाळेबाज भुजबळांना तडाखे लगावले. तेलगीकांड करणार्‍या भुजबळांनी शेतकर्‍यांना देशोधडीला लावले. ऍण्टी करप्शनमध्ये सापडलेला सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकारी सतीश चिखलीकर याच्या भ्रष्टाचाराचा चिखल भुजबळांचाच आहे. भुजबळांनी आडगाव येथील शेतकर्‍यांच्या जमिनी लुटून फस्त केल्या, सरकारी जमीन लाटून स्वत:ची भुजबळ नॉलेज सिटी उभारली. या संस्थेमध्ये सामान्यांना प्रवेश मिळतो का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. येवल्याच्या पैठणीची वाट लावली. पालखेड कालव्याचे शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी इंडिया बुल्सला दिले. तुमच्या हक्काचे पाणी पळविणार्‍या भुजबळांना लोकसभेत आडवे केले, आता विधानसभेत उताणे करणारच, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मागील निवडणुकीत पावसामुळे हॅलिकॉप्टर न आल्याने मी येऊ शकलो नाही तेव्हा भुजबळांनी उद्धव ठाकरे येणारच नाहीत, मी सेटिंग केली आहे, अशी बोंबाबोंब केली. पण याच भुजबळने शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी शिवसेना कधीही सेटिंग करणार नाही. सेटिंग करणारी अवलाद आमची नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आहे अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.
गुन्हेगारांना साधुसंत समजलात काय?
गुन्हेगारमुक्त सरकार देऊ, असे सांगणार्‍या मोदी यांनी राहुरीत कर्डिले यांच्यासाठी सभा घेतली. पण तुम्ही कोणाच्या प्रचाराला आलात. गुन्ह्यांवर गुन्हे दाखल असलेले कर्डिले तुम्हाला साधुसंत वाटले काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भगव्याशी प्रतारणा करणार्‍यांना गाडून टाका
केंद्रात अच्छे दिन येताच तुम्हाला हिंदुत्व नकोसे झाले, युतीचे नातेही तुम्ही तोडलेत. पण मोदींचे सरकार आणण्यासाठी शिवसैनिकांनी घाम गाळला आहे हे लक्षात ठेवा. शिवरायांच्या अखंड महाराष्ट्राच्या विकासाचे शिवधनुष्य मी उचलले आहे. तुम्ही साथ द्या आणि भगव्याशी प्रतारणा करणार्‍यांना गाडून टाकण्याचा विडा उचला, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
आघाडी सरकारने महाराष्ट्र लुटला
सरकारकडून पीक विमा योजनेचे आणि गारपिटीच्या भरपाईचे पैसे मिळाले काय, असे विचारताच उपस्थित शेतकर्‍यांतून ‘नाही… नाही’ असा गजर झाला. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी बाबा-दादा यांच्या भ्रष्ट कारभाराची कुंडलीच काढली. घोटाळ्यांवर घोटाळे केले, महाराष्ट्राची तिजोरी लुटली, सर्वसामान्यांना रस्त्यावर आणले, शेतकर्‍यांची लूट केली, माता-भगिनी सुरक्षित नाहीत, बेरोजगारांची फौज वाढत चाललीय. याला जबाबदार कोण याचे उत्तर द्या, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. दिलेली वचने मी पूर्ण करण्याची शपथ घेतो, शिवसेना एकटी नाही. तमाम जनता, एकलव्य संघटना, धनगर समाज, रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे आणि हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत आहेत. आपण जिंकणार आणि शिवसेनेची सत्ता येणार, असा दुर्दम्य विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
– शरद पवार म्हणतात, ‘‘तुम्हाला शेतीतले काय कळते?’’ शेतीतले आम्हाला कळत नसेलही… पण आम्हाला शेतकरी कळतो, त्याच्या डोळ्यातले अश्रू ते कांद्याने नव्हे तर तुमच्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराने आले आहेत. ते मला पुसायचे आहेत. राज्यात शिवसेनेची सत्ता आली तर शेतकर्‍यांचे भवितव्य राज्य सरकारच ठरवेल, दिल्ली नाही, हे लक्षात ठेवा.