ठाण्यात शिवसेनेची विराट सभा… उद्धव ठाकरे कडाडले!
महाराष्ट्राच्या शौर्याला आव्हान देऊ नका;
आम्ही गांडूळ शेती करत नाही!

ठाणे, दि. ११ ऑक्टोबर २०१४
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमचं रक्त सळसळतं. अगदी मुडदाही उठून बसतो… फक्त ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ!’ असे बेगडी शिवप्रेम काय कामाचे? ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आमच्या मनात स्वाभिमान जागवला तसाच अंगार शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांमध्ये निर्माण केला. भाजप नेत्यांनो, लक्षात ठेवा हा शिवरायांचा महाराष्ट्र असून आमच्या शौर्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही काय काही गांडुळ शेती करीत नाही. हा भगवा महाराष्ट्र असून दिल्लीचं मांडलिकत्व कदापि स्वीकारणार नाही, असा जबरदस्त हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात केला.
शिवसेनेच्या प्रचाराचे भगवे वादळ आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यात उसळले. मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, पालघरपाठोपाठ उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यातील सेंट्रल मैदानावर ‘न भूतो न भविष्यति’ अशी दणदणीत व खणखणीत जाहीर सभा झाली. शिवसेनागीत सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच मैदानावरील जमलेले हजारो ठाणेकर ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणा देत होते. या जाहीर सभेच्या निमित्ताने अवघे ठाणे भगवेमय झाले. त्याचाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, पलीकडे कुणाची तरी सभा आहे म्हणतात… पाचशे-सहाशे माणसे जमली आहेत. पण या मैदानात येऊन बघा. लोकसभेच्या वेळी हे मैदान तेवढे भरले नव्हते, पण आज भगव्याच्या तेजाने तुडुंब भरले आहे.
ठाण्यात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची मोठी फौजच प्रचारासाठी उतरली आहे. त्याची खिल्ली उडवत उद्धव ठाकरे म्हणाले, एक केंद्रीय मंत्री तर टेम्पोवर उभं राहून भाषण करीत होते. ऊन लागतं म्हणून ते पसार झाले. दिल्लीचे मंत्री इकडे ठाण्यात रिक्षा, टेम्पोवर उभे राहून भाषण करतात, काय हे मंत्री. अहो, या मंत्र्यांच्या सभेला जेवढी गर्दी जमते तेवढी गर्दी माझ्या व्यासपीठावर आहे असे सांगताच उपस्थितांमधून ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा दणाणल्या. ते पुढे म्हणाले, ही एवढी तुडुंब गर्दी बघून विधानसभेची लढाई आपण निश्‍चितच जिंकणार. आज मला आनंद दिघे यांची आठवण होतेय. तो योद्धा आज हवा होता, पण त्यांनी निर्माण केलेले योद्धे माझ्यासोबत असल्याने कसलीही चिंता नाही. युती कशी तुटली याचा किस्सा सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, या भाजपवाल्यांना ठाणे जिल्ह्यातीलही एक जागा हवी होती. काय तर म्हणे, आम्ही सर्व्हे केला आहे. शिवसेना मात्र जनतेची कामे करते, आम्ही तुमच्या एजन्सीप्रमाणे सर्व्हे-बिर्वे करीत नाही. ठाण्याची जागा मागता? पण याद राखा, ठाणे व शिवसेना यांचं अतुट नातं असून ती जागा मी कदापिही देणार नाही असं भाजपच्या नेत्यांना स्पष्टपणे सुनावलं होतं.
हिंदुत्वाशी नातं का तोडलं ते सांगा
भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर शब्दांचे आसुड ओढताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की, लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीतून आयात केलेल्या कपिल पाटलांचा प्रचार आम्ही केला नाही का? आता विधानसभेच्या वेळीही तुम्ही उमेदवार का आयात करता असं मी नेत्यांना सांगितलं. याच भाजपवाल्यांनी भिवंडीतील आमच्या प्रकाश पाटील यांनाही तिकीट देण्याचे आमिष दाखवले होते; पण या पठ्ठ्यानं बाणेदारपणे सांगितलं, ‘‘मी खासदार झालो तर शिवसेनेचाच होईन.’’ तुम्ही शिवसेनाप्रमुख, शिवसेना व हिंदुत्वाशी असलेलं नातं का तोडलं याचं आधी उत्तर द्या आणि मगच मतं मागा, असा सवालही त्यांनी केला.
कोणत्याही ‘शहा’पुढे मान झुकवणार नाही!
हल्लीच्या पिढीला मायकल जॅक्सन माहीत आहे, पण ज्या अनंत कान्हेरे याने जॅक्सनचा वध केला तो माहीत नाही. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा इतिहास आम्ही टॅब्लेटद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या मर्दपणाची कोणी परीक्षा घेऊ नये. या महाराष्ट्राला क्रांतिकारकांचा इतिहास आहे. शिवसेना एकटी आहे असं कुणाला वाटत असेल तर त्यांना जागा दाखवून देऊ. मी शांत आहे, संयमी आहे, पण षंढ नाही. कारण मी लढवय्या शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. सत्ता येईल जाईल पण कोणत्याही ‘शहा’पुढे महाराष्ट्राची मान झुकवू देणार नाही. आमच्या शौर्याची परीक्षा बघू नका. आम्ही शेळपट नाही, तर मर्द आहोत. शिवसैनिकरूपी वाघनखं तुमचा राजकीय कोथळा केव्हा बाहेर काढेल ते तुम्हालाही कळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, दशरथ पाटील, विजय चौघुले, प्रभाकर म्हात्रे, मानसी पाटील, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपनेते अनंत तरे, महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, शहरप्रमुख रमेश वैती, सभागृहनेते नरेश म्हस्के, महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, हेमंत पवार, माजी महापौर मनोहर गाढवे आदी उपस्थित होते.
मुरबाडमधील मातानगर मैदानात झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीवरही टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, राष्ट्रवादीनेदेखील ३०२चे आरोप असलेले तसेच बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेले उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत. अतिशय खालच्या थरापर्यंत गेलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीला हद्दपार करा.
भिवंडीतील समस्या सोडविण्यास सरकारला अपयश
भिवंडीच्या अंबाडी येथील रेणुका विद्यालयाच्या मैदानावरही शिवसेनेची जोरदार प्रचारसभा झाली. भिवंडीच्या ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य केंद्र, वीज, पाणी या समस्या सोडविण्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारला सपशेल अपयश आले असून शिवशाहीचे सरकार आल्यास आम्ही येथील आदिवासींना उद्योगधंदे उभारून रोजगार मिळवून देऊ, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
नांदगावचे बंदर होऊ देणार नाही
भाजपने शिवसेनेचा विश्‍वासघात केल्याने त्या पक्षाची विश्‍वासार्हता आता संपली असून भाजप नेत्यांवर आता कोणीच विश्‍वास ठेवणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील आंबट गाडे मैदानावरील जाहीर सभेत बोलताना सांगितले. स्थानिक प्रश्‍नांवरही त्यांनी आपली सडेतोड मते मांडली. ते म्हणाले, युती सरकारच्या काळात जनतेला नको असलेले वाढवण येथील बंदर रद्द केले. नांदगाव येथील ‘जिंदाल’ कंपनीच्या प्रस्तावित बंदरालाही स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेना हे बंदर कदापि होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
– दिल्ली-बिल्लीवाल्यांना धडा शिकवा!
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना देशाची सत्ता तुम्ही अर्धी चड्डीवाल्यांच्या हातात देणार काय, अशा शब्दांत संघाची अवहेलना केली होती. उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण पूर्वेतील पोटे मैदानावरील प्रचारसभेत त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ही टीका झाली तेव्हा भाजपच्या अगोदर आम्ही पवारांचा समाचार घेतला होता. कारण पक्ष म्हणून नव्हे, तर एक परिवार म्हणून आम्ही युतीकडे पाहत होतो. जागावाटपाच्या मुद्यावरून कुरबुरी पूर्वीही व्हायच्या, पण तेव्हा शिवसेनाप्रमुखांचा शब्द अंतिम मानला जायचा. आता मात्र ‘दिल्ली की बिल्ली’ आम्हाला आवाज देत आहे. मात्र जनता या बिल्लीवाल्यांना चांगलाच धडा शिकवेल. यावेळी शिवसेनेचे उमेदवार गोपाळ लांडगे, विजय साळवी, सुभाष भोईर यांच्यासह महापौर कल्याणी पाटील, डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी महापौर रमेश जाधव, रमेश म्हात्रे, रवी पाटील, सचिन बासरे आदी उपस्थित होते.
– पृथ्वीराज चव्हाण, साबणाच्या जाहिरातीत काम करा!
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मनसेच्या उमेदवाराबाबत वादग्रस्त विधान केले. त्या उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा संदर्भ देत पाटील यांनी सांगितले होते की, सध्या निवडणुका आहेत तोपर्यंत तरी थांबायचं होतं. याचा उल्लेख करीत उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांची चांगलीच सालटी काढली. ते म्हणाले, तुमचे आमदारही बलात्कार करतात, त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत त्याचे काय? महिलांवर अत्याचार करणार्‍यांना पृथ्वीराज चव्हाण पाठिंबा देतात. भ्रष्ट राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर चव्हाण म्हणतात की, मी स्वच्छ आहे. अहो, त्यापेक्षा तुम्ही साबणाच्या जाहिरातीत काम करा आणि फेस काढत बसा. ‘तंदुरुस्ती की रक्षा करे लाईफबॉय…’
– भिवंडीत कॉंग्रेस-मनसेला खिंडार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे भिवंडी शहर अध्यक्ष श्याम पाटील, राम लहाटे, लक्ष्मण लहाटे, शहर सचिव दिलीप कोंडलेकर, भानुदास शिंगासणे, सलिम खान, सलमान खान, संदीप मोरे, संजय गद्रे, हर्षद औसरकर यांच्याप्रमाणेच युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कुंदन पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेस-मनसेला खिंडार पडले.