उद्धव ठाकरे यांचा वज्रनिर्धार… बीकेसीत अफाट… अफाट सभा
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाचा सुवर्णक्षण शिवसेनेचाच मुख्यमंत्री साजरा करणार!
झुकेन तर शिवरायांसमोर, जिजाऊंसमोर, मॉंसाहेबांसमोर, बाळासाहेबांसमोर आणि महाराष्टातील जनतेसमोर! दिल्लीसमोर झुकणार नाही, वाकणार नाही
महाराष्ट्र तुटू देणार नाही, एक इंचही नाही…कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रही मिळवणार!
बीकेसीत शिवसेनेची अफाट… अफाट सभा झाली. या अलोट गर्दीने जणू शिवसेनेच्या विजयावर शिक्कामोर्तबच केले.
मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०१४
‘‘होय, विधानसभेची ही लढाई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. दोन वर्षांनी २०१६ मध्ये शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव शिवसेनेचाच मुख्यमंत्री साजरा करणार’’, असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला तेव्हा अलोट…अलोट गर्दीने ओसंडून वाहणारे वांद्रे-कुर्ला संकुल टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने आणि ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी दुमदुमून गेले.
विधानसभा निवडणूक प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेले दोन आठवडे अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढणार्‍या सुमारे ४५ सभा घेतल्या. राज्यात आता भगवी लाटच उसळली आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा हा झंझावात आज वांद्रे-कुर्ला संकुलात अवतरला. अवघ्या राज्याचे या सभेकडे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे कॉंगे्रस, राष्ट्रवादी आणि भाजपवर कोणता घणाघात करणार, कोणती महत्त्वपूर्ण घोषणा करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि तो क्षण आला….
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘१९६६ सालचे ते दिवस आजही आठवतायत. माझ्या आजोबा (प्रबोधनकार) आणि वडिलांना (बाळासाहेब) भेटायला खूप माणसे यायची घरी. चर्चा व्हायच्या. संवाद व्हायचा. तेव्हा साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये सदर सुरू होतं ‘वाचा आणि थंड बसा…’ खूप गाजलं ते. नंतर तर ‘वाचा आणि पेटून उठा’ असंच त्याचं स्वरूप झालं. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले, काय करायचे ठरवले आहेस? संघटना काढायचा विचार आहे की नाही? बाळासाहेब म्हणाले, हो. आजोबांनीच मग या संघटनेला नाव दिले ‘शिवसेना’. १९ जून १९६६ ही ती तारीख. शिवसेनेचा स्थापना दिन. मुहूर्त बघितला नाही, पंचांग पाहिले नाही. सहदेव नाईक म्हणून बाळासाहेबांचे सहकारी होते. ते श्रीफळ घेऊन आले. आजोबांच्या हस्ते श्रीफळ वाढवले. शिवसेना स्थापन झाली.
शिवसेना स्थापनेची ही आठवण सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, २०१६ म्हणजे दोन वर्षांनी शिवसेना सुवर्णमहोत्सव साजरा करणार. पण लक्षात ठेवा, ही विधानसभेची लढाई आम्हीच जिंकणार आणि शिवसेनेचा सुवर्णमहोत्सव शिवसेनेचाच मुख्यमंत्री साजरा करणार. एवढेच नव्हे तर दोन वर्षांत राज्य विकासाच्या किमान ५० योजना मी पूर्ण करणारच असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
उद्धव ठाकरे यांची तोफ आज धडाडली आणि कॉंगे्रस, राष्ट्रवादी व भाजपच्या पार चिंधड्या उडाल्या. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो आजची ही माझी पाचवी सभा आहे. दररोज ६-७ सभा करत फिरतोच आहे. महाराष्ट्रातील एकही कोपरा, एकही जिल्हा सुटला नसेल. संपूर्ण महाराष्ट्रच भगवा झाला आहे. आलेल्या प्रत्येक संकटावर मात करत आपण इथपर्यंत आलो आहोत आणि हे धाडस फक्त आपणच करू शकतो. दुसर्‍या कुणात ती धमकच नाही. बाकीच्यांच्याही सभा होतायत. बडी बडी माणसं येतायत आणि गल्लीबोळात सभा घेतायत. आताही कुणाची तरी कुठेतरी सभा सुरू आहे. पण माणसं कुठून आणली, तर गुजरातमधून. पण आमच्याकडे बघा. हा माझ्यासमोरचा जनसागर तुमच्यासारखा आयात केलेला नाही. माझे कडवे शिलेदार आहेत हे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विभाग क्रमांक दोनच्या वतीने विभागप्र्रमुख आमदार ऍड. अनिल परब, प्रकाश (बाळा) सावंत, संजय पोतनीस यांनी भव्य पुष्पहार घालून स्वागत केले. सोबत खासदार संजय राऊत, आमदार रामदास कदम, ऍड. लीलाधर डाके, खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेना नेते तसेच रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अनिल कांबळे.
या निवडणुकीत आजपर्यंत कधी घडल्या नव्हत्या अशा गोष्टी घडल्या. युती तुटली तेव्हा ‘मातोश्रीवर’ महाराष्ट्रातील वारकरी आले होते. त्यांनी तेव्हा माझ्या डोक्यावर त्यांचा तो विठूनामाचा फेटाही बांधला. तो क्षण खरोखरच भाग्याचा होता. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे संतवचन आहे. दसरा संपला. आता १५ तारखेला महिषासुराचा वध करून आपण भगवी दिवाळी साजरी करणार आहोत. तर वारकर्‍यांनी बांधलेला तो फेटा मला राजमुकुटापेक्षा मोलाचा आहे. त्यानंतर शीख बांधव आले. त्यांच्या पुजार्‍यांनी मला आशीर्वाद दिले. म्हणाले, ‘उद्धवजी, आप डरिए मत. हम साथ है…’ मी म्हटले, मी डरणार? कुणाला? मी डरणारा नाहीच आहे. पण खरं सांगायचे तर ही सर्व शिवसेनाप्रमुखांची पुण्याई आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात दंगल उसळली, पण महाराष्ट्रात शीख बांधवांच्या केसालाही धक्का लागला नाही आणि तो केवळ शिवसेनाप्रमुखांमुळेच. भाजपने युती तोडली हे कुणालाच आवडलेले नाही. गुजराती बांधव आज माझ्याकडे येतायत, भेटतायत. म्हणतात, दिल्लीसाठी भाजपला मत दिले, पण मुंबई-महाराष्ट्रात शिवसेनाच पाहिजे. शिवसेना आहे म्हणून आम्ही येथे सुरक्षित आहोत.
तुमची हिंमतच झाली नसती
भाजपवाले मला सांगतात मर्यादा सांभाळा म्हणून. मी तुमच्यावर बिलकूल टीका करीत नाहीये. आजही मला ते दिवस आठवतायत. महापौर बंगल्यावर शिवसेनाप्रमुख, अटलजी गप्पा मारत बसले होते. इतक्यात आदित्य आला आणि अटलजींकडे त्याने सही मागितली. कुठे माहीत आहे? टी-शर्टवर, पाठीमागे. युतीचे ऋणानुबंध आम्ही असे जपले. पण तुम्ही काय केलंत आता? तर युती तोडलीत. शिवसेनाप्रमुख असते तर युती तुटलीच नसती असे तुम्ही म्हणता. अरे, शिवसेनाप्रमुख असते तर तुमची युती तोडण्याची हिंमतच झाली नसती.
समुद्रसुद्धा लाजेल
आजची संध्याकाळ ही प्रचाराची शेवटची संध्याकाळ आहे. उद्या ५ वाजता प्रचार संपणार आहे. तमाम शिवसैनिक आज पेटून उठला आहे. गावागावाकडे मुले व त्यांचे आजोबासुद्धा शिवसेनेची सत्ता आणायचीच या ईर्षेने काम करीत आहेत. मधमाश्यांचे मोहोळ उठावे तसे सर्वजण पेटून उठले असून संभाजीनगर, पुणे, ठाणे येथील सभांमधून एक तुफान उठले आहे. समुद्रसुद्धा लाजेल असा प्रतिसाद शिवसेनेला मिळत आहे.
सर्व्हेवर नाही तर तुम्हा सर्वांवर विश्‍वास
कशासाठी युती तोडलीत, काय गरज होती तुम्हाला? अमित शहा यांनी मध्यंतरी विचारले, कैसा चल रहा है, कुछ सर्वे किया या नहीं? मी त्यांना सांगितले, हम सर्वे नही मेहनत करते है. अरे कसला सर्व्हे? माझा सर्व्हेवर विश्‍वास नाही तर तुम्हा सर्वांवर विश्‍वास आहे. लोकसभेत एनडीएला बहुमत मिळेल असे सर्वांचेच सर्व्हे सांगत होते. त्यात शिवसेनेच्या किती जागा येतील असे कुणी सांगत होते का? अनेकजण मला विचारतात, किती जागा येतील? मी त्यांना सांगितले, सर्वच्या सर्व येतील आमच्या. १८ जागा आल्या ना, कशाला हवा सर्व्हे. माझा तुम्हा सर्वांवर विश्‍वास आहे. शिवसेनेचीच सत्ता राज्यात येणार असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, ऍड. लीलाधर डाके, शिवसेना नेते रामदास कदम, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, उपनेत्या विशाखा राऊत, मीना कांबळी, विभागप्रमुख ऍड. अनिल परब आणि दत्ता दळवी यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केले.
…तर युती तुटली नसती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांनी केलेली शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली होती. त्या युतीत एक भावना होती. कोणतीही खेचाखेची नव्हती. भाजपात अटलजी आज कारभार बघत नाहीत. आडवाणींना किती महत्त्व आहे हे माहीत नाही. पण अटलजी जरी आज भाजपचे काम पाहत असते तरी ही युती तुटली नसती. याचं कारण अटलजींनी जे लिहून ठेवले आहे ती कविता मला आठवते…
‘कदम मिलाकर चलना होगा.’
कदम मिलाकर चलना होगा
बाधाये आती है आये…
धीर प्रलय की घोर हटाए
पावते ही की अंगार है
शीर पर बरसे यदी ज्वालाए
नीज हातोंमे हसते हसते
आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा।
– अजित पवारांकडे फक्त साडेचार लाख हा अपमानच
मी कुणाला उद्देशून बोललो नाही. एका बाजूला अफझलखान महाराष्ट्र लुटून पैसा फस्त करणारे कॉंग्रेसवाले आणि दुसर्‍या बाजूला केंद्रातील मंत्री येताहेत. पैसा बाहेर पडतोय. भाजपच्या दहिसरमधील उमेदवाराच्या गाडीत ५० लाख सापडले आणि ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा करणार्‍या अजित पवार यांच्या गाडीत फक्त साडेचार लाख हा त्यांचा अपमान नाही का, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अख्खं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात
भाजपवर शरसंधान करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्रात उतरवलंय यांनी. ओळखीचे ना पाळखीचे. मूठभर माणसांसमोर भाषण ठोकतायत. परवा तर गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल कर्जतमध्ये येऊन गेल्या. राजनाथ सिंहसुद्धा येऊन गेले. या सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन ठेवा… १९ तारखेनंतर यांना फोन करा, बघा उचलतात काय ते. हे बघा, जे घडले त्याचे दु:ख तर आहेच पण त्यापेक्षा संताप अधिक आहे.
सभेत प्रत्येक शिवसैनिक उद्धव ठाकरे
मंत्रालयावर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला आहे. आपले लाडके नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी आजच्या अतिविराट सभेला हजेरी लावली. भगवा झेंडा उंचावत आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’च्या घोषणा देतानाच उद्धव ठाकरे यांच्या चेहर्‍याचे मुखवटे चेहर्‍यावर चढवूनच शिवसैनिक सभेत हजर झाला. त्यामुळे आजच्या सभेत जिकडे तिकडे गर्दीमध्ये केवळ ‘उद्धव ठाकरे’च दिसत होते.
ही उद्याच्या लढाईची सुरुवात -महापौर
आजची मुंबईतील निवडणूक प्रचाराची सभा ही शेवटची सभा आहे; मात्र ही सभा शेवटची नसून ही उद्याच्या लढाईची सुरुवात आहे, असे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगताच जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम समाजही आपल्याकडे आला आहे. या सर्वांना एकच सूर्य दिसतोय आणि हा सूर्य म्हणजे शिवसेनाच, असे सांगतानाच स्वस्थ बसू नका, डोळ्यांत तेल घालून जागते रहा, गाफील राहू नका, असे आवाहनही आंबेकर यांनी केले.
मुस्लिम आणि मातंग समाजाचा पाठिंबा
शिवसेनेचे हात बळकट करण्यासाठी आज तीन पक्ष आणि संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिया पीपल्स पार्टी, भारतीय वाल्मीकी समाज आणि महाराष्ट्र मातंग सेना या तीन पक्षसंघटनांनी शिवसेनेला आज जाहीर पाठिंबा दिला.
१५ ऑक्टोबरला बदला घ्या -डांगळे
ज्यांनी भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला अधोगतीला नेले आणि ज्यांनी महायुती तोडली या सर्वांचा येत्या १५ ऑक्टोबरला बदला घ्या. शिवसेनेलाच मतदान करा, असे आवाहन रिपाइं नेते अर्जुन डांगळे यांनी केले. मित्रपक्षांच्या १८ जागा गिळंकृत करणार्‍या आणि भ्रष्टाचारी ६० उमेदवार आयात केले त्या भाजपाला धडा शिकविण्याचे आवाहन करतानाच, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
क्षणचित्रे
– वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर भगवी लाट. संपूर्ण मैदानात भगव्याबरोबरच निळे झेंडे डौलाने फडकत होते.
– या महासभेसाठी प्रचंड गर्दी जमली होती. सभेला महिला आणि तरुणांची संख्या अधिक.
– भगव्या साड्या परिधान करून महिला, तर भगवे शेले आणि भगव्या टोप्या परिधान करून पुरुषांनी हजेरी लावली.
– सभेपूर्वी ‘जय मल्हार’च्या वेशात तलवार उंचावत आलेला तरुण पाहताच एकच जल्लोष आणि टाळ्या.
– मैदानातील आठही स्क्रीनवर शिवसेनेच्या निवडणूक जाहिराती आणि व्हिजन डॉक्युमेंट दाखविण्यात आले.
– जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत… हातात भगवे झेंडे घेऊनच शिवसैनिक मैदानात येत होते.
– ‘उद्धवसाहेब आगे बढो’च्या घोषणांनी संपूर्ण मैदान दणाणून गेले.
– ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा आणि जल्लोषाने मैदान दणाणले.
– स्टेजवरील ‘महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे’ आणि ‘चला उठा, महाराष्ट्र घडवूया’ ही दोन वाक्ये प्रत्येक शिवसैनिकाचा मंत्र बनली होती.
ही लढाई स्वाभिमानाची
‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवा!
ही विधानसभा निवडणूक संकट नसून संधी आहे. ही लढाई स्वाभिमानाची आहे. त्यामुळे या संधीचे सोने करा. ‘जय महाराष्ट्रा’चा नारा दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवा, असे जबरदस्त आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावरील शिवसेनेच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी अत्यंत जल्लोषात आणि आक्रमकपणे भाषण केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पिसे काढतानाच भाजपचा बेगडी बुरखाही टराटरा फाडला.
आदित्य ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टवादी आहे. हे एवढे भ्रष्टवादी आहेत की यांचा सातबारा मंगळावरही मिळेल. परवाच एका शास्त्रज्ञाला विचारले, मंगळवार पाणी आहे का? तर ते म्हणाले, आदित्य, हळू बोला. मंगळावर पाणी आहे हे राष्ट्रवादीला कळले तर ते तिथेही जातील आणि सिंचन घोटाळा करतील…
दिल्लीची दादागिरी मोडली
जागावाटपाच्या वेळी दिल्लीश्‍वरांनी फर्मान काढले, अडवून पाहिले, पण उद्धव ठाकरे दिल्लीसमोर झुकले नाहीत. उलट दिल्लीची दादागिरी मोडीत काढली, असा घणाघातही आदित्य यांनी लगावला.
२४ वर्षांचा असल्याचा अभिमान
महायुतीच्या जागावाटपाच्या वेळी मी स्वत: भाजप नेते ओमप्रकाश माथूर यांना भेटलो. त्याची वर्तमानपत्रांत बातमी आली. त्यामुळे भाजपातील काही नेत्यांचा जळफळाट झाला. त्यांना मी २४ वर्षांचा असल्याचे खटकले. पण मला त्याचा अभिमान आहे. माझे वय खटकणारे हेच लोक तरुण तरुण आणि तरुण हिंदुस्थानबाबत बोलत आहेत. भाजपवाले वेगळा विदर्भ करण्याची भाषा करीत आहेत. त्यातही त्यांच्यात एकवाक्यता नाही. विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्र अस्थिर होईल असे सांगतानाच मी खोटं बोलत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे रक्त माझ्या अंगात आहे. शिवरायांना अभिमान वाटेल असा अखंड महाराष्ट्र बनवू, असे आदित्य यांनी सांगितले. निवडणूक निकालानंतर पुन्हा दसरा मेळावा साजरा करू असे सांगताना अमित शहा आणि सहकार्‍यांची रावण बनण्याचीही लायकी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
– पायजमा तुम्हीच उतरवलात
राजनाथ सिंह यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगलेच शालजोडीतले हाणले. ते म्हणाले, काल कुणी नेता टेम्पोवर उभा राहून २०० लोकांसमोर भाषण ठोकत होता. म्हणाला, ‘मुझे गर्मी बहुत हो रही है…’ अरे होणारच, ही शिवसेनेची धग आहे. आजपर्यंत आमचे प्रेम अनुभवलेत, आता ही धग सोसा. तो नेता म्हणतो कसा, देशाने सदरा दिला, तुम्ही पायजमा द्या! अरे, पायजम्याशिवाय नुसता सदरा घालून तुम्ही कुठे कसे जाऊ शकता? कसे दिसेल ते? तुमचा पायजमा आम्ही नाही उतरवला तर तुम्हीच तो उतरवलाय हे लक्षात ठेवा.
तुम्हाला सोबत घेऊन मी ही लढाई लढतोय. पण मी फक्त एक चेहरा आहे, एक शन्यू आहे… माझ्यासमोर हा जनसागर उसळला अहे तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी नव्हे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी.
भाजपने युती तोडली हे कुणालाच आवडलेले नाही. गुजराती बांधव आज माझ्याकडे येतायत, भेटतायत. म्हणतात, दिल्लीसाठी भाजपला मत दिले, पण मुंबई-महाराष्ट्रात शिवसेनाच पाहिजे. शिवसेनेमुळेच आम्ही इथे सुरक्षित आहोत.