मुक्ताईनगर, जळगाव येथील अतिविराट सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन
महाराष्ट्रात शिवसेनेच्या भगव्याचाच लखलखाट होऊ द्या!

मुक्ताईनगर/जळगाव, दि. १३ ऑक्टोबर २०१४
‘‘मराठी जनहो, तुमच्या सुखदु:खात साथ देणारा, सदैव तुमच्यासोबत असणारा शिवसैनिकच आहे. त्यामुळे १५ तारखेच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात फक्त शिवसेनेच्या भगव्याचाच लखलखाट होऊ द्या!’’ अशी हाक देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणीत समारोप केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुक्ताईनगर आणि जळगाव येथील विराट जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी ही साद देताच खान्देशी जनतेनेही वज्रमूठ उंचावून शिवसेनेचा भगवाच विधान भवनावर फडकवण्याची ग्वाही दिली.
शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात सोमवारी जळगावात अवतरला. रणरणत्या उन्हात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भगवे विचार हृदयात साठवून घेण्यासाठी अक्षरश: शिवसैनिकांचे मोहोळच उठले होते. ‘‘खोट्याचा फडशा पाडण्यासाठीच मी आलो आहे,’’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच सभेमधून ‘जय भवानी जय शिवाजी’ असा महागजर झाला.
युतीच्या मारेकर्‍याचे डिपॉझिट जप्त करा
‘‘भाऊ भाऊ म्हणून ज्याला जवळ घेतला तोच लाथा मारायला लागला. किती मस्ती, किती माज! याद राखा, शिवसेना म्हणजे विझलेला निखारा नव्हे! हा धगधगता ज्वालामुखी आहे. या निखार्‍याशी खेळ करू नका. तुमच्या पापांचा पाढा वाचायला लागलो तर दिवस पुरणार नाही. युतीचे मारेकरी कोण? हेच नाथाभाऊ!’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजपच्या वर्मावरच घाव घातला. गेली २५ वर्षे शिवसैनिकांच्या मेहनतीवर आयत्या रेघोट्या मारत असलेल्या नाथाभाऊंना या निवडणुकीत असे अस्मान दाखवा की, त्यांची अनामत जप्त झाली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच जमलेल्या अफाट जनसमुदायाने वज्रमूठ आवळून तशी ग्वाहीच दिली.
तुम्ही कोण होता?
पंचवीस वर्षांपासूनची सोबत आज यांना अचानक नकोशी झाली. का? ताकद वाढल्याचा अहंकार यांना झाला. जरा मागे वळून बघा. पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही कोण होता? काय होता? काय करत होता? आमदार झालात. मंत्री झालात. विरोधी पक्षनेतेपदावर बसलात. जी जी सत्तेची पदे उपभोगलीत, ती मिळवून देण्यासाठी माझ्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले आहे. तुमचे वैभव हे शिवसैनिकांच्या कर्तृत्वाचे फळ आहे. निवडून आले की म्हणे लाट आणि पडले की आमचे पाप! बघा, शिवसेनेचे भगवे वादळ. परंतु अन्यायालाही मर्यादा असते. माझा शिवसैनिक सहनशील आहे, नामर्द नाही. ही शिवरायांची मावळी फौज आहे. बरे झाले युती तुटली. नाही तर अन्यायाला वाचाच फुटली नसती, असे खडे बोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
जनतेची इच्छा असेल तर मुख्यमंत्री होईन
उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे युती तुटली, असा कल्ला यांनी सगळीकडे चालवलाय. अरे मला देणारे तुम्ही कोण? मला देण्याची तुमची लायकी नाही. मला देणारे हे माझ्यासमोर बसले आहेत. जनतेची इच्छा असेल तर होईनही मी मुख्यमंत्री. हिंदुत्वाशी आमचे नाते आहे, नव्हे हिंदुत्व आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. युतीधर्म म्हणून तुम्हाला निवडून दिले, पण आता तुमचे चाळे खपवून घेणार नाही. हा संताप आता मतपेटीतून व्यक्त झाला पाहिजे. मैदानासमोरच्या डोंगरावर तरुण भगवे झेंडे घेऊन बसले होते. तेथे धनुष्यबाणही कोरण्यात आला होता. त्याकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, पहाडासारख्या छातीवरच धनुष्यबाण शोभून दिसतो.
तेव्हा अंजीर, आता खंजीर
शिवसेना आणि भाजपचे संबंध २५ वर्षांचे. हिंदुत्वाच्या बंधनाने हे दोन्ही पक्ष एकत्र बांधले गेले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून घाम गाळला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच युती तोडली, पाठीत खंजीर खुपसला अशी भाषा आज वापरली जात आहे. मग तेव्हा काय अंजीर खात होता? दिवाकर रावते व अनिल देसाई हे दोघे भाजप नेत्यांची वाट पाहत बसले होते. साधा निरोप देण्याचे सौजन्य न दाखवता भाजपचा गोतावळा निघून गेला आणि संध्याकाळी एकनाथ खडसे यांचा फोन आला. म्हणाले, उद्धवजी, आपले २५ वर्षांचे संबंध तुटले. आता युती नाही. कोण आहे युतीचा मारेकरी मी का… असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच ‘नाथाभाऊ, नाथाभाऊ…’ असा पुकारा करत अख्खी सभा उभी राहिली.