दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही!
१२ ऑक्टोबर बीकेसीत शिवसेनेची जाहीर सभा.
शिवसेनेची सत्ता आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करणार.
एलबीटीच्या त्रासातून मुक्तता करणार, ऑक्ट्रॉयसुद्धा हटवणार.
वन विंडो सिस्टीम सुरू करणार, सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी.

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०१४
‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो चलो मोदी के साथ’चा नारा कशासाठी? या महाराष्ट्राने तुम्हाला साथ दिली होती. त्यावर तुम्ही लाथ मारलीत. ज्या छत्रपतींचा आशीर्वाद मागून तुम्ही पुढे जाण्याची स्वप्ने बघत आहात त्याच शिवरायांनी कुणासमोर झुकायचे नाही ही शिकवण आम्हाला दिली आहे. हा महाराष्ट्र दिल्लीश्‍वरांपुढे कदापि झुकणार नाही हे लक्षात ठेवा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे ठणकावले.
उत्तर मुंबईतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बोरिवली कोरा केंद्र येथे विराट जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप-कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सालटे काढली. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडावरची शस्त्रे अर्जुनाने खाली उतरवली होती. पण समोर बसलेला शिवसैनिक हीच माझी शस्त्रे आहेत. या निवडणुकीत त्यांच्या साथीनेच विरोधकांचा पाडाव करून महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवेन, असा जबरदस्त आत्मविश्‍वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. माझ्यासमोर कोण शत्रू आहे हे मला माहीत नाही, पण मी महाराष्ट्राच्या विकासासाठी शस्त्र उचलून लढाईसाठी सज्ज झालोय. असे असताना भाजपने आमच्याशी असलेली युती तोडली. गेल्या २५ वर्षांपासूनचे हिंदुत्वाचे नाते तोडले हे महाराष्ट्र व देशातील तमाम हिंदूंना आवडलेले नाही. आज आम्ही रणांगणात उतरलो आहोत. त्यामुळे आमच्यासमोर जो असेल तो आमचा शत्रूच आहे. त्यामुळे कानाखाली मारून आता सॉरी बोलायचा प्रकार मुळीच खपवून घेणार नाही, तर जो कोणी समोर येईल त्याला ठोकूनच काढायचे आणि ठोकूनच काढणार, असे उद्धव यांनी ठणकावले.
रिजनल असलो तरी ओरिजिनल आहोत
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले आज जरी वेगवेगळे लढत असले तरी हे दोन्ही पक्ष पूर्वीपासूनच एकच आहेत. शिवसेना-भाजपने युतीच्या माध्यमातून पुढे जाण्याची गरज असताना युती तोडण्यात आली, पण युती तोडणार्‍यांनो आणि शिवसेनेला रिजनल म्हणणार्‍यांनो हे लक्षात ठेवा, आम्ही रिजनल असलो तरी ओरिजिनल आहोत. मराठी व हिंदुत्वासाठी लढणारी फौज आमच्याकडे आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणार्‍या राष्ट्रीय पक्षांना ठणकावले.
फिफ्टी फिफ्टीने पोट भरले नाही म्हणून एकटे लढून ओरबाडायला निघालेत!
सिंचन घोटाळ्याची फाइल माझ्याकडे टेबलावर होती. तिच्यावर सही केली असती तर अजित पवारांची जयललिता झाली असती असे पृथ्वीराज चव्हाण आज सांगताहेत. अजित पवारांना वाचवायचे काम कुणी केले हे त्यांनी आधी सांगावे. ज्यावेळी सिंचन घोटाळा आम्ही उघडकीस आणला त्यावेळी राजीनामा देऊन मंत्रिमंडळाबाहेर गेलेल्या अजित पवारांना श्‍वेतपत्रिका काढून क्लीन चिट कुणी दिली? तुम्ही स्वच्छ व कार्यक्षम मुख्यमंत्री होता मग आज जाहिरातीत सही करणारे दिसणारे तुमचे हात अजित पवारांसंदर्भातील फाइलवर सही करण्यासाठी का नाही हलले? अडीच वर्षे न हललेल्या बिल्डरांच्या फायली गेल्या सहा महिन्यांत कशा हलल्या की तुमचा फिफ्टी फिफ्टीचा कारभार चालू होता? त्याने पोट भरले नाही म्हणून दोन्ही पक्ष एकटे लढून महाराष्ट्र ओरबाडायला निघालेत. सिंचन, टोल, कोळशातसुद्धा भ्रष्टाचार केलात. तुम्ही काय एकमेकांच्या फायली काढणार! राज्यात शिवसेनेचे सरकार आणून आम्हीच त्या बाहेर काढणार आहोत. मग बघूया तुम्हाला कोण वाचवते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या मेळाव्यास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, विनोद घोसाळकर, अनिल परब, आदेश बांदेकर, अनिल देसाई यांच्यासोबत विनय जैन, उत्तमप्रकाश अग्रवाल, प्रकाश सुर्वे, शुभदा गुडेकर, अमोल कीर्तिकर, माजी महापौर सुनील प्रभू, राम पंडागळे हे शिवसेनेचे उमेदवारसुद्धा उपस्थित होते.
शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते विश्‍वनाथ नेरूरकर, राम पंडागळे यांचीही यावेळी भाषणे झाली.
पुढचा दसरा मेळावा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत
दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या दिमाखात साजरा होतो. या वर्षी आचारसंहिता असल्यामुळे मेळावा झाला नाही. पण पुढच्या वर्षी दसरा मेळावा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत मोठ्या दणक्यात साजरा केला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेचा दसरा मेळावा हे महाराष्ट्राचे वैभव आहे आणि ही परंपरा कदापि खंडित होणार नाही, असेही ते म्हणाले.
केक तुम्ही खायचा व आम्ही मेणबत्त्या लावायच्या काय?
शिवसेना-भाजपची युती ही आजची नाही तर २५ वर्षांपासूनची होती. निवडणुकीच्या जागांचे वाटप करताना दोघांनी ९-९ जागा मित्रपक्षांना द्यायचे ठरले होते. त्यावरून बोलणी पुढे जात नसल्याने आम्ही १८ जागा सोडायची तयारी दर्शविली. पुढे काय बिनसले माहीत नाही. दिल्लीतील लोकांनी फिफ्टी-फिफ्टीची मागणी केली म्हणजे आम्ही ३५ ते ३६ जागा यांना अशाच सोडायच्या. वाढदिवस आहे काय? केक तुम्ही कापून खायचा व आम्ही मेणबत्त्या लावायच्या? हे मुळीच घडणार नाही, असे आम्ही ठणकावून सांगितले. मुंबईत ३६ जागा आहेत. ३५ ते ३६ जागा म्हणजे एक गोवा राज्य देण्यासारखे आहे. हे कशासाठी आम्ही करायचे? ही शिवसेना माझ्या शिवसैनिकांनी वाढवलीय. त्यांच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही.
शिवसेनेत कॉंग्रेस-मनसे कार्यकर्त्यांचा प्रवेश
सभेवेळी शिवसेना तसेच मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कॉंग्रेसचे मलबार हिल येथील पदाधिकारी राजकुमार बाफना तसेच राजा जाधव, योगेश राव, त्याचप्रमाणे वॉर्ड क्र. ४२चे मनसे वॉर्ड अध्यक्ष सुभाष सावंत, मनोज पाटील, प्रथमेश ठाकूर, वैभव सावंत, सचिन तळेकर, विजय जाधवसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती भगवा देऊन त्यांचे स्वागत केले.
तुम्ही युवाशक्तीला काय न्याय देणार!
आज आमचे पंतप्रधान सांगताहेत २०२० साली संपूर्ण जगात हिंदुस्थान हे एकमेव युवाराष्ट्र असेल. होय, हे राष्ट्र युवकांचे असेल. पण त्या तरुणांच्या रोजीरोटीचा काय विचार केलाय? युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेत्यांसोबत भाजपकडे चर्चेला पाठवले म्हणून तुमचा अहंकार दुखावला. मग तुम्ही युवाशक्तीला काय न्याय देणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
सर्वात पहिली धावून येणारी शिवसेना
हिंदुत्व व मराठी माणसाला न्याय देण्याचे काम नेहमी शिवसेनेने केले. या महाराष्ट्राशी शिवसेनेचे नातं हे केवळ मतासाठी नसून रक्ताचं नातं आहे. ज्या ज्या वेळी या मुंबई-महाराष्ट्रावर संकट आले त्या त्या वेळी शिवसेना पहिली धावून गेली. मुंबईत जर शिवसेना नसेल तर तुमच्या मदतीला धावून येणारे दुसरे कुणी आहे का? (असा प्रश्‍न करताच समोर बसलेल्या शिवसैनिक-मतदारांनी नाही… नाही… फक्त शिवसेनाच असा एकच जल्लोष केला.) तुमचं आमचं नातं हे रक्ताचं असून ते कुणीच तोडू शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिल्लीपुढे कधी झुकले नाहीत. उद्धव ठाकरेसुद्धा त्याच मार्गाने शिवशक्ती आणि भीमशक्तीला सोबत घेऊन पुढे जात आहेत. दुसरीकडे भाजपवाले फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या भुलथापांना भुलू नका. भाजपने आंबेडकरी चळवळीचा अवमान केला आहे. शिवशाही हवी की अमितशाही, याचे उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. आंबेडकरी जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहून शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी यावेळी दिली.