स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची तयारी ठेवा!- उद्धवसाहेब ठाकरे
(१९ जून २०१६)

– शिवसेनेची एकहाती सत्ता आणून दाखवेन, असे ठणकावतानाच स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची तयारी ठेवा, अशी महागर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अलोट… अलोट गर्दीच्या साक्षीने केली तेव्हा शिवसैनिकांच्या हजारो वज्रमुठी आसमंताच्या दिशेने उसळल्या. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणांनी एनएसईचे मैदान दणाणून गेले. शिवसेनेच्या ५०व्या वर्धापन दिनाचा सुवर्ण सोहळा १९ जून २०१६ रोजी  उदंड उत्साह आणि जल्लोषात साजरा झाला.

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचा दिमाखदार, अविस्मरणीय असा देदीप्यमान सोहळा गोरेगावच्या एनएसई मैदानावर प्रचंड गर्दीत आणि उदंड उत्साहात साजरा झाला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची मुलुखमैदानी तोफ पाऊण तास धडाडली. उद्धवसाहेब ठाकरे यांनी भाजपवर जोरदार आसुड ओढतानाच राजकारण्यांची चांगलीच पिसे काढली. शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल हे सांगतानाच संघर्षाचा धगधगता निखारा त्यांनी शिवसैनिकांच्या हाती दिला.

राज्यात नऊ महापालिकांसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी तयार राहा. कारण भाजप नेते व्यंकय्या नायडू शिवसेनेबद्दल बरे बोलत असले तरी त्यांचे प्रदेशाध्यक्ष मात्र भलतेच काही बोलत आहेत. त्यांच्यातच घोळ आहे. त्यामुळे उद्या काय होणार, समोरून काय होतंय हे पाहूच. पण आपणही आपल्या ताकदीवर निवडणुका लढविण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे उद्धवसाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले, केवळ हिंदू मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून इतर राज्यांत निवडणुका लढवल्या नाहीत. पण आज हे स्वतःला सिंह समजत आहेत. सिंह मागे वळून बघतो त्याला सिंहावलोकन म्हणतात. वाघ मागे वळून पाहत नाही. सिंह कळपाने जातो, वाघ कळपाने जात नाही. त्यामुळे उगाच आव आणू नका, असा जबरदस्त घणाघात उद्धवसाहेब ठाकरे यांनी भाजपवर केला तेव्हा सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गजर झाला.
१९९२—९३ च्या दंगलीत मुंबई पेटली, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनामुळेच ती शांत झाली यांची आठवण करून देतानाच उद्धवसाहेब ठाकरे पुढे म्हणाले, त्या वेळी ‘मंदिर वहीं बनायेंगे’चा प्रोग्राम होता. बाबरी पाडून राममंदिर उभारणार होते. तेव्हा राम मंदिर हा राष्ट्रीय मुद्दा होता. कारसेवक गोळा झाले. अयोध्येला गेले आणि एकेदिवशी बाबरी पडल्याची बातमी आली. शिवसेनाप्रमुखांना ही बातमी सांगितली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख ठणाकावून म्हणाले, ‘‘त्यात जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमानच असेल.’’ पण त्यावेळी यांचे नेते सुंदरसिंग भंडारी यांनी बाबरी कोणी पाडली हे माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. तेव्हा शिवसेनाप्रमुख संतापले. म्हणाले, ‘अरे हे कसले नेते! कार्यकर्त्यांच्या पाठी उभे राहू शकत नसतील तर असले नेते काय कामाचे. असे लोक नेते होऊच शकत नाहीत.’ हाच धागा पकडून उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले, ‘अरे बाबरी पाडलीत ना, मग जबाबदारी का घेतली नाही? ९२च्या डिसेंबर ते जानेवारीपर्यंत दंगल भडकली होती. आम्हाला गुंड म्हणून हिणविणार्‍यांनो, जर शिवसेना नसती तर मुंबईचे काय झाले असते हे लक्षात घ्या. त्यावेळी स्वतःला सिंह म्हणवून घेणारे शेपूट घालून कोणत्या बिळात बसले होते, अशा शब्दांत उद्धवसाहेब ठाकरे यांनी भाजपची पिसे काढली.
अशा कित्येक लाटा शिवसेनेने झेलल्या आणि पचवल्या
उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘‘रजनी पटेल त्यावेळी काँग्रेसचे शहेनशहा होते. त्यांनी शिवसेनाप्रमुखांना एक पत्र पाठविले आणि त्यावर सही करायला सांगितले. सही नाही केली तर तुरुंगात पाठविण्याची धमकीही दिली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ते पत्र ज्यांनी आणले त्याला दिले आणि म्हणाले, हे पत्र पटेलांकडे घेऊन जा आणि सांग, जेव्हा मला तुरुंगात टाकशील तेव्हा दुसर्‍याच दिवशी तुझी तिरडी उठलेली दिसेल. त्या काळातही शिवसेनेवर बंदी घालण्याची अनेकांनी फडफड केली. हे आता लाट आली म्हणून फडफड करत आहेत. लाट येते आणि जाते. लाटेशिवाय आणि वार्‍याशिवाय हे फडफडू शकत नाहीत. लाटेत ओंडकेही तरंगतात, पण लाट जाताच गोटे राहतात. वार्‍यावर फडकीही फडकतात, पण वारा नसतानाही केवळ भगवाच डौलाने फडकत असतो.’ असे उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगताच ‘जय भवानी, जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा गगनभेदी गजर घुमला.
जे ममता आता म्हणताहेत तेच शिवसेनेने ६६ मध्ये सांगितले
शिवसेनेने मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला. त्यामुळे शिवसेनेवर टीका झाली. गुंडांची पार्टी आणि संकुचित पक्ष म्हणून हिणवले गेले. हेच टीकाकार मात्र ममता बॅनर्जींचे कौतुक करत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी १९६६ मध्ये जे सांगितले तेच ममता बॅनर्जी ‘माँ, माटी आणि मानुष’ आता म्हणाल्या. त्या बंगालीबाबूंनी याच मुद्द्यावर दिल्लीश्‍वरांना पाणी पाजले. मला त्यांचे कौतुक करायचे आहे असे उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले. मी तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव करून दिली. आणखी वेळ मिळाला असता तर चित्र पालटून दाखवले असते.
पवारांनी सल्ला देऊ नये!
यावेळी उद्धवसाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी नालायकांसोबत राहू नये असे पवार म्हणाले होते. पवारांनी मला सल्ला दिला, नालायकांसोबत राहू नका. ते नालायक आहेत हे मला काय माहीत. पहिल्या सरकारसारखाच लोकांना अनुभव आला तर हे सरकार नालायक ठरेल असे बोललो होतो. हे माझे वाक्य होते. आम्हाला सल्ले पवारांनी देऊ नयेत. ते वयाने आणि कर्तबगारीने मोठे आहेत. पण आमचे काय ते आम्ही बघून घेऊ, असा टोला उद्धवसाहेब ठाकरे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांबद्दल अजून काही बोललो नाही. उलट त्यांचे कौतुकच केले. मी कधीही मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला असे म्हटले नाही. पवारसाहेब, तुम्ही बोललात आणि त्यांच्यासोबतच राहिलात. तुम्हीही भांडत होता. पण तुम्ही स्वतःसाठी भांडलात आणि आम्ही जनतेसाठी भांडतोय, असे फटकारे उद्धवसाहेब ठाकरे यांनी यावेळी लगावले.
तीन महिन्यांत पंतप्रधानांच्या २७ सभा
लोकसभा निवडणुकीनंतर आपण युती युती करत राहिलो. त्यानंतर तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी २७ सभा घेतल्या. आम्ही अनुभवाने आता शहाणे झालो आहोत, असेही उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले.
हशा आणि टाळ्या
– ‘‘सर्व निवडणुका एकत्र घ्याव्यात का अशी चर्चा आहे. खरेच सर्व निवडणुका एकत्र घेतल्या पाहिजेत. कारण अनेकजण परदेशात जातात. त्यांच्या दौर्‍यात व्यत्यय नको. नाहीतर त्यांना दौरे सोडून यावे लागेल.’’ (प्रचंड हशा)
– ‘‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वगळता इतर निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान आणि मंत्र्यांनी जाऊ नये. कारण पदावर असल्याने त्यांच्या पदाचा मतदारांवर लवकर प्रभाव पडतो. सत्ता हातात असल्याने लोकांचा त्यांच्यावर पटकन विश्‍वास बसतो. त्यामुळे सत्तेवरच्या लोकांनी प्रचाराला जाऊ नये. मंत्रीपदाची शपथ घेताना सर्वांशी प्रेमाने वागेन असे म्हणता, मग कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, अगदी अपक्ष उमेदवारही असो, त्याच्या प्रचाराला जाणार का? (प्रचंड टाळ्या)
– ‘‘कुणावरही टीका करत नाही, पण सत्य सांगतो. ज्यांनी ज्यांनी सत्ता मिळविली त्यांनी पंतप्रधान किती झाले, मुख्यमंत्री किती झाले आणि हिंदुहृदयसम्राट किती झाले, हा प्रश्‍न स्वतःला विचारावा.’’ (प्रचंड टाळ्या)
मराठी माता, हिंदुत्व हाच धर्म आणि हिंदुस्थान हाच देश लाभू दे!
उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले, पावसाळा नसता तर ही सभा खुल्या मैदानात घेतली असती. कारण षण्मुखानंद हॉलही पुरला नसता. सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे आणि पावसाचेही आगमन झाले आहे. हे शुभचिन्ह आहे. आज वटपौर्णिमाही आहे. महिलांनी धागेदोरे बांधून जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून प्रार्थना केली आहे. शिवसैनिक म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की आम्हाला जन्मोजन्मी मराठी माता, हिंदुत्व हाच धर्म आणि हिंदुस्थान हाच देश लाभू दे!