महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे
देशातील महिला सध्या असुरक्षिततेच्या छायेत जगत आहेत. देशभरात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला असून अशा परिस्थितीत महिलांना गरज आहे ती आत्मसंरक्षणाची. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याच्यासह वुमेन्स सेल्फ डिफेन्स सेंटर नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमानुसार अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल येथील पाच हजार चौरस फूट वातानुकूलित जागेत महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे देणारे मार्शल आर्टस्, कराटेचे प्रशिक्षण खुद्द सिनेस्टार अक्षयकुमार देणार आहे. वुमेन्स सेल्फ डिफेन्स सेंटरच्या आणि प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ‘महिलांनो, नराधमांना धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हा’, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. या वेळी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर हेही उपस्थित होते.

अक्षयकुमार चित्रपटांप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही स्टंटमन आहे. अशा सुपरस्टारने काही सांगितले तर अख्ख्या देशाला समजते. त्यामुळे अक्षयच्या आवाहनाने महिला सक्षमीकरणाचा संदेश सर्वत्र पसरेल. महिलांना देशात सुरक्षित वाटले पाहिजे, महिलांना आपल्या मनाप्रमाणे हवे तिथे, हवे तेव्हा वावरता यायला हवे. त्यांनी कसा पोशाख करावा यावर तरी बंधने कशाला हवीत. त्यांना देशात सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगता यायला हवे, असेही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. त्याचबरोबर महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूमद्वारेही अक्षय विद्यार्थ्यांशी आत्मसंरक्षणाबाबत संवाद साधणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या वेळी सांगितले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महिलांना आत्मसंरक्षणासाठी धडे देण्याचा हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, तो स्तुत्य असाच आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.